बंद

    इतिहास

    १८६० मध्ये ब्रिटिश सरकारने धुळे जिल्हा न्यायालयाची स्थापना केली. धुळे येथे जिल्हा न्यायालय स्थापन करण्यापूर्वी ऑर्थर सेंट गॉर्ज रिचर्डसन हे या प्रदेशातील न्यायिक कामकाज पाहत होते. माननीय न्यायमूर्ती श्री. महादेव गोविंद रानडे यांनी १८८० ते १८८१ या काळात धुळे येथे सहाय्यक न्यायाधीश म्हणूनही काम केलेले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा न्यायालयाला भेट दिलेली आहे. धुळे जिल्हा पूर्वी खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. प्राचीन काळी याला रसिका म्हणून ओळखले जात होते. नंतर, यादवांच्या काळात, त्यावर राज्य करणाऱ्या राजा सेनुचंद्राच्या नावावरून याला सेनुदेसा असे संबोधण्यात आले. मुस्लिमांच्या आगमनाने, फारुकी राजांना देण्यात आलेल्या खान या उपाधीच्या अनुषंगाने हे नाव बदलून खानदेश करण्यात आले. खान्देशातील संपूर्ण क्षेत्रामध्ये दोन जिल्ह्यांचा समावेश होता. त्यामध्ये धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग होता. त्याचे मुख्यालय धुळे येथे होते. तथापि, १९०६ मध्ये प्रशासकीय कारणास्तव, खान्देशचे पश्चिम खान्देश आणि पूर्व खान्देश या दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. धुळे येथे मुख्यालय असलेल्या पश्चिम खान्देश जिल्ह्यात धुळे, नंदुरबार, नवापूर पेठ, पिंपळनेर, शहादा, शिंदखेडा, तळोदा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला.

    १९५६ मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेसह, पश्चिम खान्देशचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला आणि त्यानंतर १९६० मध्ये तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला. १९६१ मध्ये जिल्ह्याचे नाव पश्चिम खान्देश ऐवजी बदलुन धुलिया आणि नंतर धुळे जिल्ह्याचे मुख्यालय धुळे असे करण्यात आले. त्यानंतर धुळे जिल्ह्याचे १ जुलै १९९८ रोजी धुळे आणि नंदुरबार या दोन नवीन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. नव्याने निर्माण झालेल्या महसूल जिल्हा नंदुरबार (त्याचे मुख्यालय नंदुरबार येथे आहे) मध्ये नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी (धडगाव) तालुक्यांचा समावेश आहे. त्यानंतर ३१-१०-२०१३ पासून नंदुरबार न्यायिक जिल्हा धुळे न्यायिक जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला आहे. धुळे न्यायिक जिल्ह्यात सध्या साक्री, शिंदखेडा, शिरपूर आणि दोंडाईचा येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालये आहेत.

    धुळे मुख्यालयात जिल्हा व सत्र न्यायालय, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाची न्यायालये आणि मुख्य न्यायदंडाधिकारी तसेच न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालये आहेत. धुळे मुख्यालयात अगोदर निर्देश केलेल्या न्यायालयाव्यतिरिक्त, इतर चार न्यायालये म्हणजे, एक कामगार न्यायालय, एक औद्योगिक न्यायालय, एक कौटुंबिक न्यायालय आणि एक सहायक धर्मादाय आयुक्त देखील धुळे येथे कार्यरत आहेत.